हृषीकेश मुखर्जींचे गाजलेले चित्रपट सगळ्यांनाच माहित आहेत ! आनंद, अभिमान, नमकहराम असे अनेक चित्रपट आजही रसिकांच्या मनात कायमचे घर करून आहेत. पण हृषिदांचा हिंदीतला पहिला चित्रपट "मुसाफिर" फार कमी लोकांना माहित असेल ! १९५७ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. (म्हणजे माझ्या जन्माच्याही आधी). पण मी हृषिदांचे चित्रपट डाऊन लोड करून बघण्याचा सपाटा लावला, त्यावेळी हा चित्रपट प्रथम बघितला आणि या प्रतिभाशाली दिग्दर्शका बद्दलचा आदर अजूनच वाढला !
हा चित्रपट म्हणजे एक अफलातून प्रयोगच होता. चित्रपटामध्ये दिलीपकुमार, सुचित्रा सेन, डेविड, किशोरकुमार, केष्टो मुखर्जी (याचाही पहिला हिंदी चित्रपट) असे एकापेक्षा एक दिग्गज कलाकार होते ! चित्रपटाची कल्पना एकदम भन्नाट होती ! डेविड स्वतःचे घर भाड्याने देतो आणि त्यामध्ये वेगवेगळे भाडेकरी येउन राहतात ! त्या भाडेकरूंचे आयुष्य, सुखदु:खे यावर आधारित अतिशय वेगळा चित्रपट !
पुन्हा या सगळ्यांचा संबंध जीवनाशी जोडून माणूस हा सुद्धा शेवटी एक मुसाफिर असतो, हे सुचविले होते !
या अनेक कुटुंबापैकी एक कुटुंब असतं - एक सासरा (नाझीर हुसैन), त्याची विधवा सून (निरुपा रॉय ) आणि मुलगा भानू (किशोर कुमार). सुनेच्या पोटात मोठ्या मुलाचा अंश वाढत असतो आणि ती पतीच्या विरहामुळे दु:खात असते. निरुपा रॉयने ही भूमिका चपखलपणे निभावली आहे.
ही वहिनी दु:खात असताना तिला आनंदी करण्यासाठी तिचे दु:ख कमी करण्यासाठी किशोरकुमार एक गाणे म्हणतो. हे गाणे नुसते ऐकणे पुरेसे नाही, तर बघायलाही पाहिजे. कारण किशोरकुमारने हे गाणे म्हटलेच नाही तर या गाण्यावर अप्रतिम अभिनयही केला आहे. पुन्हा निरुपा रॉयचा सहजसुंदर अभिनय अगदी आवर्जून पाहावा असा आहे. शैलेंद्रचे सहजसोपे आणि अर्थपूर्ण शब्द, सलिल चौधरीचे सुंदर संगीत आणि किशोरचा नटखट आवाज या कारणांमुळेच हे गाणे एक मास्टरपिस बनले आहे.
त्या काळातल्या साध्या, सरळ आयुष्याचेच जणू प्रतिबिंब त्यात पडलेले दिसते. या कारणामुळेच हे गाणे हृदयाला भिडून जाते.
गाण्याची सुरुवातीला निरुपा रॉय खिन्नपणे बसलेली असते. तेवढ्यात किशोरकुमार ला एक लहान मुलांचे मासीक सापडते. त्यातील एक गाणे तो वहिनीला म्हणून दाखवितो आणि तिचे मन प्रफुल्लीत करण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण गाणे अगदी निरागसतेने भरलेले आहे. किशोरकुमार गाणे म्हणायला सुरुवात करतो.
मुन्ना बडा प्यारा, अम्मीका दुलारा
कोई कहे चांद, कोई ऑखका तारा
हसे तो भला लगे, रोये तो बुरा लगे
अम्मीको उसके बिना, कुछ्भी अच्छा ना लगे
तुमको लगे मेरी उमर, जियो मेरे लाल !
सुरुवातीला भाभी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही, पण हळूहळू ती त्या गाण्याकडे ओढली जाते. आपल्या पोटातल्या त्या लहानग्या जीवाची ती पण कल्पना करू लागते. पुढचे कडवे मग तिला अधिकच भावून जाते.
एक दिन वो मांसे बोल, क्यो फुकती है चुला?
क्यू न रोटीयोके पेड हम लगाये?
आम खाये, रोटी खाये, रोटी आम खाले
काहे करे रोज रोज तू ये झमेला?
आंब्याच्या झाडाप्रमाणेच पोळीचे पण झाड लावायचे, म्हणजे मग आईला रोज पोळ्या करण्याची कटकटच नको ! त्या बोबड्याचे ते बोल ऐकून वहिनीपण खुदकन हसते ! पण पोळी अशी झाडाला लागत नसते तर ती कष्ट करून कमवावी लागते, हा संदेश गाण्यात अगदी सहजपणे दिला आहे.
अम्मीको आई हंसी, हसके वो कहने लगी
लाल मेहनत के बिना, रोटी किस घरमे बनी ?
जियो मेरे लाल, जियो मेरे लाल !
अशा या आनंदी वातावरणात पुढचे कडवे मात्र मनाला स्पर्शून जाते. एक दिवस बाळ अचानक कुठेतरी दिसेनासे होतं.
एक दिन जो छुपा मुन्ना, धुंढे न मिला मुन्ना
बिस्तरके निचे कुर्सियोके पीछे,
देखा कोना कोना, सबकी सांस खीचे
कहा गया कैसे गया, सब थे परेशान!
आणि मग शेवटचे कडवे गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते.
सारा जग धुंढ चुके, कही मुन्ना ना मिला
मिला तो प्यार भरी मांकी आंखोमे मिला
बाळ शेवटी सापडलं कुठे तर आईच्या प्रेममयी डोळ्यात! आणि या वेळा निरुपा रॉयच्या डोळ्यातील भाव अगदी पाहण्यासारखे आहेत. प्रेम आणि वात्सल्य जणू तिच्या डोळ्यात मूर्तिमंत दिसून येतं.
गाणे संपल्यावर त्याचा प्रभाव कितीतरी वेळ जाणवत राहतो. अतिशय साधे, सहजसुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारे गाणं !
किती ग्रेट होती ची माणसे? हृषिदा, शैलेंद्र, सलील चौधरी, निरुपा रॉय आणि किशोरकुमार ! किशोर हा नुसताच गायक म्हणून थोर नव्हता, तर एक उत्तम कलाकारही होता, हे या गाण्यात प्रकर्षाने जाणवतं !
मला जर माझ्या आवडत्या गाण्यांची यादी करावीशी वाटली तर त्यात या गाण्याचा नक्कीच समावेश होईल !
जर हे गाणे बघितले नसेल तर अवश्य बघा, कितीतरी वेळ हे गाणे तुमच्या मनात घोळत राहील !
No comments:
Post a Comment